जेजुरी : नीरा-जेजुरी मार्गावरील दौडज गावच्या हद्दीत तरसदरा फाट्याजवळ ओलेक्ट्रा कंपनीच्या बसने स्कुटीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात वाल्हा येथील ५४ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. सुनील बाबुराव राऊत (रा. गांधी चौक, वाल्हा, ता. पुरंदर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी जेजुरी पोलीस ठाण्यात बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.४४ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. नीरा येथून जेजुरीच्या दिशेने बस जात असताना चालक मिद्दे वेंकटया नागार्जुन (वय ३०, रा. नल्लावेल्ली, तेलंगणा) याने समोरील वाहनांना डाव्या बाजूने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी बस अचानक दुचाकीच्या लेनमध्ये घेतल्याने स्कुटीला पाठीमागून जोरदार धडक बसली.
या अपघातात सुनील राऊत यांचे दोन्ही पाय तुटले, तसेच डोक्याला आणि शरीरावर गंभीर दुखापती झाल्या. त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातात बस आणि स्कुटीचेही नुकसान झाले.
याप्रकरणी रुग्णवाहिका चालक शुभम लक्ष्मण चव्हाण (वय २५, रा. साकुर्डे, ता. पुरंदर) यांनी फिर्याद दिली आहे. बसचालकाने वाहन निष्काळजीपणे व धोकादायक पद्धतीने चालविल्याने अपघात झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. जेजुरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १८६(१), २८१, १२५(अ), १२५(ब), ३२४(२), ३२४(६) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक थोरात करीत आहेत.
सूचना : ही बातमी समजावून सांगण्यासाठी वापरलेले छायाचित्र AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) द्वारे तयार केलेले प्रातिनिधिक चित्र आहे. हे अपघाताचे वास्तविक छायाचित्र नाही.
.png)
0 Comments